
डॉ.विकास आमटे यांचे मत
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि बाबांचे आनंदवन यांच्यातील आपुलकीचे नाते विलक्षण होते. ज्याकाळी आनंदवनातील कुष्ठरोग्यांना मनोरंजनासाठी सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी नव्हती अशावेळेस आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या मनोरंजनाची सोय व्हावी यासाठी मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या माध्यमातून स्वर्गीय लता मंगेशकर यांनी आनंदवनला मौलिक मदत केली. त्यांच्या कृतीतून आनंदवनावरील प्रेम सदैव व्यक्त होत राहिले.त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बाबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज बाबांच्या समाधीजवळ स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने बकुळीच्या झाडाचे वृक्षारोपण केले आहे.या झाडाच्या माध्यमातून लताताईची आठवण आनंदवनवासी व येथे येणाऱ्या पाहुण्यांना सदैव होत राहील. आनंदवन आणि लता मंगेशकर यांच्यातील कौटुंबिक संबंध नेहमी स्मरणात राहील, असे विचार महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले. ते श्रद्धेय बाबा आमटे यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्ताने आनंदवनातील श्रद्धावनात बाबांच्या समाधी समीप आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात बोलत होते. कोवीडचे नियम पाळीत अत्यंत साधेपणाने झालेल्या या कार्यक्रमास महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सर्वश्री डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, सदाशिव ताजणे, शकील पटेल, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते माधव कवीश्वर, प्रमोद बक्षी, प्राचार्य सुहास पोतदार, राजेश ताजने, रोहित फरताडे, शौकत खान आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. आमटे यांनी स्वरानंदवनचा जन्म कसा झाला याबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच स्वर्गीय लतादीदी आणि बाबा आमटे यांच्यातील कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.

लताताईचे आनंदवनावर विलक्षण प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी आनंदवनला भरभरून मदत केली. ते आनंदवन परीवार कधीच विसरू शकणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करताना अश्विनी आंधळकर यांनी माहिती देताना सांगितले की, आनंदवन आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांच्यातील जानेवारी १९८४ चा पत्रव्यवहार मिळाला असून त्यातील शेकडो पत्रे सुंदर दस्तऐवज आहे. त्यात लतादीदींनी बाबांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असताना एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाचा गोळा झालेला निधी आनंदवनला द्यायचा आहे असे सांगितले.या पत्रानंतर मंगेशकर परिवार आणि आनंदवन परीवार यांच्यातील नाते दृढ होत गेले. लतादीदींनी कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदवनला मौलिक मदत केली. आनंदवन आणि लता मंगेशकर यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे सुंदर दस्तऐवज असल्याची माहिती दिली. साधेपणाने झालेल्या या कार्यक्रमास निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
