Thursday, August 5, 2021
spot_img
HomeMain-sliderमहाराष्ट्र राज्याच्या बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धांचे वेळापत्रक जाहिर,

महाराष्ट्र राज्याच्या बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धांचे वेळापत्रक जाहिर,

जळगांव / महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेने नुकत्याच वरिष्ठ खुला गट व महिला गट तसेच कनिष्ठ गट मुले व मुली अशा खेळाडूंसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार विविध वयोगटातील स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले असून या वयोगटातील प्रथम दोन विजेते खेळाडू आगामी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.

दिनांक १९ व २० जुलै रोजी वरिष्ठ महिला गट आणि कनिष्ठ गट (मुले) यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाईल. तर दिनांक २१ व २२ जुलै रोजी वरिष्ठ खुला गट (सर्वांसाठी प्रवेश खुला) आणि कनिष्ठ गट (मुली) यांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.सदर बुद्धिबळ स्पर्धा ही टोर्नेलो या बुद्धिबळ खेळासाठी निर्मित संकेत स्थळावर ऑनलाइन स्वरूपात खेळवली जाणार असून खेळाडूंना ‘झूम’ व ‘टोर्नेलो’ या दोघांवर एकाचवेळी असणे बंधनकारक असणार आहे.अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या बुद्धिबळ स्पर्धांसाठी यावर्षी वितरीत केल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. तब्बल एक लाख रुपये वरिष्ठ गटासाठी तर साठ हजार रुपयांची रोख पारितोषिके कनिष्ठ गटासाठी नियोजित असतील.कनिष्ठ गटातील मुले व मुली यांच्या प्रत्येक वयोगटासाठी ३० हजार रुपये तर वरिष्ठ वयोगटासाठी पुरुष व महिला या प्रत्येक वयोगटासाठी ५० हजार रोख बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आपल्या लौकिकाला साजेशी संघटनात्मक पाऊले उचलत खेळाडूंना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवीत आहे.बुद्धिबळ स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच राज्य निवड चाचणी स्पर्धेत इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडूंना रोख बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत.महिला व मुलींना देखील पुरुष खेळाडू इतकेच महत्त्व व बक्षिसांच्या रकमे इतकाच समान न्याय देत संघटना बुद्धिबळ स्पर्धांच्या आयोजनात नवीन मापदंड आखत आहे.कोरोना सदृश्य परिस्थितीत देखील खेळाडूंचे कुठलेही नुकसान न होऊ देता त्यांचे मनोधैर्य जपल्यामुळे सर्व स्तरांतील खेळाडूंकडून संघटनेच्या स्पर्धा आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.संघटनेने ऑनलाइन स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य लीलया पेलत खेळाडूंचा प्रवासाचा,राहण्याचा–खाण्याचा वेळेची प्रचंड बचत केली असल्याने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धा तयारीसाठी वेळ उपलब्ध होत आहे.याचे सुखद पडसाद महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेनिमित्ताने सर्वांना अनुभवास मिळाले,जेंव्हा महाराष्ट्रीय खेळाडूंनी अनेक विजेतेपदे आपल्या नावावर केली.

नुकत्याच पार पडलेल्या लहान मुलांच्या राज्य निवड चाचणी स्पर्धेला तसेच राज्य शालेय स्पर्धेला तब्बल ३५०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.माफक प्रवेश शुल्क व भरघोस बक्षिसे,उत्कृष्ट नियोजन व सर्व समावेशक कार्यप्रणाली याने संघटनेने बुद्धिबळ प्रेमिंच्या हृदयात स्थान मिळवले असून महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेने या खेळाला पुर्वी सारखीच प्रतिष्ठा मिळवून देण्याचे ठरवले असल्याचे प्रतीत होत आहे असे बुद्धिबळ जाणकारांनी मत नोंदविले आहे.राज्य निवड चाचणी नियोजित स्पर्धांसाठी महाराष्ट्रचेस.ऑर्ग (maharashtrachess.org) व चेस सर्कल.कॉम (chezzcircle.com) या संकेतस्थळांवर बुद्धिबळ प्रेमींनी भेट द्यावी असे राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्ध जी मयूर यांनी व सचिव निरंजन जी गोडबोले यांनी आवाहन केले आहे.महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ भक्कम असावा यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे.

दि.१९ व २० जुलै रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेश स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ जुलै असून २१ व २२ रोजी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धांसाठी प्रवेशासाठी अंतिम मुदत २० जुलै असणार आहे.सर्व प्रवेश फक्त ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारले जाणार आहेत.सदर स्पर्धा प्रवेश नोंदणीसाठी सर्व जिल्हा संघटनांनी तसेच इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य संघटनेमार्फत केले गेले आहे.भरत चौघुले:९८५०६५३१६०,प्रवीण ठाकरे:९२२६३७५०७७,विलास म्हात्रे:८८८८०११४११.

प्रतिनिधी/प्रदीप देशमुख जिल्हा जळगांव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love