संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून क्षयरोग दुरीकरणाचे काम अत्यंत जबाबदारीने बजावत आहेत. आम्ही वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन आमच्या विविध प्रलंबित, न्यायिक व रास्त मागण्या पूर्ण करण्याबाबत विनंती केलेली आहे आणि वेळोवेळी पाठपुरावा करुनही आश्वासना खेरीज आमच्या पदरात काहीच पडलेले नाही.
परिणामी नाईलाजास्तव इंटिग्रेटेड हेल्थ सोसायटी युनियन, चंद्रपूर आमच्या संघटनेने दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन / कामगार दिनापासून लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. लेखणी बंद मध्ये निक्षय पोर्टल वरील नोंदणी, इतर डेटा एन्ट्री, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अहवाल सादर करणे, ऑनलाईन (VC) किंवा ऑफलाईन मिटिंग, इतर कोणतीही माहिती देणे, इ. सर्व गोष्टींवर बंद पुकारण्यात आलेला आहे. मा. संचालक, आरोग्य सेवा, पुणे २ ह्यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली असता कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आंदोलन मागे घेऊ नये असे सर्वानुमते ठरविण्यात आलेले आहे. आम्ही फक्त लेखणी बंद केलेले आहे परंतु रुग्ण सेवा, रुग्णाचे निदान, रुग्णांना औषोधोपचार देणे, काउंसेल्लिंग, नियमित पाठपुरावा, इ. सर्व कामे सुरु आहेत. आमच्या न्याय, रास्त मागण्या पूर्ण होईपर्यंत किंवा राज्य संघटनेने आंदोलन मागे घेण्याचे निर्देश देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आम्ही मा. वरिष्ट अधिकारी ह्यांना नम्रपणे अवगत केलेले आहे. नवीन रुजू झालेले मा. डॉ. ललित पटले सर, जिल्हा आरोग्य अधिकारी (क्षयरोग), चंद्रपूर ह्यांचे इंटिग्रेटेड हेल्थ सोसायटी युनियन, चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले तसेच आमच्या न्याय मागण्यांसाठी मा. वरिष्ट अधिकारी यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल ह्या अपेक्षेने त्यांना निवेदन देण्यात आले आहे. इतर आरोग्य कर्मचारी जे कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी इंटिग्रेटेड हेल्थ सोसायटी युनियन, चंद्रपूर सोबत लढ्यामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आलेले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. सूरज डुकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन बर्डे, मुख्य संचार अधिकारी मा. श्री. प्रशांत तुरानकर तसेच इतर पदाधिकारी ह्यांनी दिले .